संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तीन वर्षांपासून ठप्प पडलेला अकोल्यातील बांधकाम व्यवसाय पूर्ववत रुळावर येत आहे. कृत्रिम दरवाढीमुळे अकोल्यातील पाचशे बिल्डर्स मंडळी बँक आणि खासगी कर्जाच्या चक्रात अडकली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत पुन्हा उभारी येत असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येत आहे.ब्रोकर आणि बिल्डसर्ंकडून झालेली दरवाढ अंगलट आल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प पडला होता. महापालिकेने लावलेला कारवाईचा अंकुश आणि जीएसटीमुळे बिल्डरांसह बांधकाम व्यावसायिकांवर अवकळा आली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारात नवचैतन्य आले असून, फ्लॅट खरेदीसाठी अकोलेकर पुन्हा सरसावू लागले आहेत. मागणी वाढल्याने कर्जात सापडलेले बिल्डर्संना दिलासा मिळाला आहे. काही जुने आणि नवीन मिळून जवळपास ३८00 फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. १९८0 च्या डीसीआरनुसारच अकोल्यात बांधकाम व्यावसायिकांचे कामकाज सुरू होते. महापालिका झाली; पण बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीचा पत्ता नव्हता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी शहरातील १८६ इमारतींना नोटीस बजावून, अवैध बांधकाम थांबविले. तेव्हापासून या इमारतींचे बांधकाम रखडले असून, नवीन बांधकामाला मनपाकडून परवानगी नाकारली जात होती. त्यामुळे अकोल्यातील बांधकाम व्यवसाय ठप्प पडला. दरम्यान, क्रेडाईच्या पुढाकारानंतर ‘ड’ वर्गीय महापालिकांना एक ‘एफएसआय’ वाढवून देण्यात आला. दरम्यान, नवीन ‘ऑटो डीसीआर’च्या मंजुरीनंतर आणि १ एप्रिल १७ पासूनच्या नवीन ‘रेडिरेकनर’च्या बाजार मूल्यभावाने अकोल्यातील फ्लॅटच्या किमती अधिक वाढल्या. अवैध बांधकामाची धास्ती आणि पूर्वीपेक्षाही घर महागणार असल्याने बांधकाम व्यावसायिक चिंतातूर झाले होते; मात्र दलालांनी फुगविलेली कृत्रिम दरवाढ आता थांबल्याने ग्राहक आणि बिल्डर्स सावरले आहेत.
अकोल्यातील बिल्डर्संची स्थिती राज्यातील उद्ध्वस्त शेतकर्यांसारखी झाली होती . नोटाबंदी, रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर मोठा परिणाम दिसून आला; मात्र आता पुन्हा बाजारपेठेत चांगली स्थिती निर्माण होत आहे. -दिलीप चौधरी, अकोला जिल्हाध्यक्ष, क्रेडाई.-