बुलडाणा: दरवर्षी गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र पश्चिम विदर्भात पाहावयास मिळत आहे. वर्ष २0१५ मध्ये पश्चिम वर्हाडात अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यात तब्बल १0 हजार ३७५ गुन्हे घडले. यामध्ये बुलडाणा जिल्हा आघाडीवर असून, त्यापाठोपाठ अकोला व तिसरा क्रमांक वाशिम जिल्ह्याचा लागतो. अमरावती विभागात पाच जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७0९ गुन्ह्यांच्या घटना घडल्या. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, छेडछाड, बलात्कार, चोरी, लुटमार या गुन्ह्यांचा समावेश आहे.गुन्हेगारी रोखणे ही पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढेच कर्तव्य जनतेचेसुद्धा आहे. गुन्हेगारीमुळे सामाजिक वातावरण दूषित होऊन कायदा व सुव्यवस्था बाधित होते. गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध सामजिक संघटना आपआपल्या पातळीवर प्रयत्न करीत असतात; मात्र तरीही गुन्ह्यांचा आलेख सतत वाढताच असल्याचे चित्र पश्चिम विदर्भात पाहावयास मिळत आहे. ज्या भागात रेल्वे सुविधा आहे अशा जिल्ह्यात व शहरामध्ये गुन्ह्याच्या घटना अधिक घडत असल्याचे दिसून आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, मलकापूर, नांदुरा ही तीन शहरे वगळली तर रेल्वे लाइन कोठेही नाही; मात्र तरीही बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्याच्या घटना घडल्याचे आकडेवारी वरून दिसते. तेरा तालुके असलेला व मराठवाडा ते खान्देश अशा विस्तीर्ण पसरलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल २५ लाख ८८ हजार ३९0 एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात ४ हजार २१३ विविध गुन्हे घडले. बुलडाण्याच्या तुलनेत अकोला हे महापालिकेचे शहर असून, रेल्वे लाइनवर आहे तरीदेखील या जिल्ह्याचा क्राइम रेट कमी आहे. अकोला जिल्ह्यात केवळ सात तालुके असून, जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १८ हजार ६१७ एवढी आहे; मात्र या जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या ३ हजार ७१२ एवढी आहे. तर वाशिम जिल्ह्याचा क्राइम रेट सर्वात कमी आहे. वाशिम जिल्ह्यात ५ तालुके व १0 लाख २0 हजार २१७ एवढी लोकसंख्या आहे. या जिल्ह्यात मागील वर्षी २ हजार ३७0 एवढे गुन्हे घडले आहेत.
पश्चिम विदर्भात गुन्हेगारीत बुलडाणा जिल्हा अव्वल
By admin | Published: February 15, 2016 2:10 AM