रवी दामोदर
अकोलाः खरीप हंगाम तोंडावर आला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्याच्या ‘सर्जा-राजा’ची खरेदी-विक्री बंद आहे. परिणामी बैलाद्वारे केली जाणारी मशागतीची कामे अडचणीत आली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे बैलांचे भाव दुपटीने वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतात मशागतीची कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे शेतकरी बैलांच्या साहाय्याने मशागतीची कामे करीत असल्याचे चित्र आहे. एप्रिल व मे महिन्यात बैल जोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैल बाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मशागतीसाठी बैलांची आवश्यकता असल्याने काही शेतकरी बाजार बंद असल्याने वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. त्यामुळे बैलांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामाची कामे लक्षात घेत बैल बाजार सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------------------------------------------
एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांच्या खरेदी-विक्रीला येतो वेग !
खरीप हंगामात साधारणत: जून, जुलै महिन्यात पेरणी केल्या जाते. त्यापूर्वी मशागतीची कामे पूर्ण करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजार बंद असल्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बैलांचे दर वाढविल्याचे चित्र आहे. गतवर्षी ५० हजार रुपयात मिळणारी जोडी यंदा ६० ते ७० हजार रुपयांत मिळत असल्याचे चित्र आहे.
---------------------------------------------
गुरांच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक अडचणीत
बाजार बंद असल्याने बैल जोड्यांचे दर वाढले आहेत. तसेच चांगले व जातीवंत बैल मिळणे कठीण झाले आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने बैलाच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. तसेच गुरांच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिकही अडचणीत सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
-------------------------------------
मशागतीसाठी बैलजोडीची गरज आहे. ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविल्याने बैलांद्वारे मशागत परवडणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बैल बाजार सुरू करण्याची गरज आहे.
-धीरज सिरसाट, शेतकरी, सांगळूद.