खामगाव : मृग नक्षत्रास ८ जूनपासून प्रारंभ होत असून, पेरणीपूर्वी मशागतीने ग्रामीण भागात जोर पकडला आहे. पेरणीसाठी बैल आवश्यक असल्याने ४ जून गुरुवारच्या बाजारात बैल खरेदी-विक्रीला चांगलीच गर्दी जमली होती. खरिपाच्या तोंडावर बैलबाजार तेजीत होता. एकाच दिवशी तब्बल २८९ बैलांची खरेदी-विक्री झाली. गत दोन-तीन वर्षात पावसाच्या अनिश्चिततेने शेतकरी पार खचला आहे. पेरणीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गो-पालन शेतकरी करतात. मध्यंतरी गोवंश-हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर बैलाच्या किमती कमालीच्या घसरल्या होत्या. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला. मार्च-एप्रिलमध्ये बैलाची खरेदी-विक्री कमी झाली होती. खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने बैलबाजारात पुन्हा गर्दी जमू लागली आहे. गत दोन आठवड्यापासून बैलबाजारात म्हैस, बैल, बकरी, बोकड, मेंढी आदी हजारो जनावरे विक्रीला येत आहे. ३0 मे च्या आठवडी बाजारात बैल २७४, म्हैस १२७, बकरी ६९५, अशी खरेदी-विक्री होती. ४ जूनच्या बाजारात तब्बल ७00 ते ८00 बैलांची खरेदी-विक्री झाली. म्हैस १८१ व बकरी - ७६ जनावरांची विक्री झाली आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर बैलबाजार तेजीत
By admin | Published: June 06, 2015 12:48 AM