ग्राहकांना शुद्ध साेन्याची हमी देण्यासाठी सुवर्ण दागिन्यांवर हॉलमार्क असणे शासनाने बंधनकारक केले आहे. सराफा व्यावसायिकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे, मात्र त्याच सोबत एचयूआयडी कायदाही लागू करण्यात आला आहे. हा कायदा लहान सराफा व्यावसायिकांसोबतच कारागिरांसाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. या विरोधात अकोल्यातील सराफा व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. त्या अनुषंगाने अकोला सराफा असोसिएशनतर्फे सोमवार २३ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सांकेतिक बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे सोमवारी दिवसभर सोने-चांदीची दुकाने बंद राहणार आहेत.
जाचक नियमांमुळे सराफा व्यावसायिक अडचणीत
दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी सराफा व्यावसायिकांना ‘एचयूआयडी’साठी नागपूर येथील बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोला पाठवावे लागतील. ही प्रक्रिया वेळखाऊ राहणार असल्याने लहान दुकानदार व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. याशिवाय इतर जाचक नियमांमुळे लहान व्यावसायिकांना सराफा व्यवसाय करणेही कठीण होणार असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सराफा व्यावसायिक हॉलमार्कच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत, मात्र एचयूआयडीला विरोध आहे. यासाठी लावण्यात आलेल्या नियमांचा व्यापाऱ्यांना त्रास हाेत आहे. सर्वच स्तरावर यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे या विरोधात सोमवारी अकोला सराफा असोसिएशनतर्फे बंद पुकारण्यात आला आहे.
शैलेश खरोटे, अध्यक्ष, अकोला सराफा असोसिएशन, अकोला