अकोला : एकाच समाजातील दोन गटांतील निवडणुकीतील वाद उफाळून आला. यात दोन्ही गटांतील सदस्य समोरासमोर उभे ठाकून हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा सोनटक्के प्लॉटमधील एका विवाह समारंभात घडली. मारहाणीत एका गटाचा सदस्य जखमी झाला. जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. जुने शहरातील सोनटक्के प्लॉटमध्ये आयोजित एका विवाह समारंभामध्ये शनिवारी उशिरा रात्री काही युवकांनी एकमेकांवर कांदे फेकले. यावरून वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. यात अब्दुल जमील ऊर्फ अब्दुल हकीम हा जखमी झाला. त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अब्दुल जमील याचा भाऊ अब्दुल सलीम याला पोलिसांनी अटक केली. वादाचे मुख्य कारण कांदे फेकण्याचे नसून, महापालिका निवडणुकीतील वाद असल्याचे बोलले जाते. या वादातूनच काँग्रेसचे अल्लू पहिलवान व भारिप बमसंचे रऊफ पहिलवान यांच्या गटातील सदस्यांमध्ये हाणामारी झाली. फिरोज खान दुल्हे खानच्या तक्रारीनुसार अब्दुल रहमान, शकील, समीर, अब्दुल जमील, अब्दुल सलीम यांच्याविरुद्ध तर अब्दुल समीर याच्या तक्रारीनुसार दुसर्या गटातील जाकीर खान, फिरोज खान, दुल्हे खान, नासिर जावेद, वाजिद, मिया खान यांच्याविरुद्ध जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला. रात्री सोनटक्के प्लॉट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दोन गटांत तुंबळ हाणामारी
By admin | Published: May 08, 2017 2:48 AM