उरळ: भारनियमनामुळे चार वर्षीय चिमुलीला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना उरळ येथे घडली आहे. सलोनी विनोद वानखडे असे या चार वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. उरळ येथे कारंजा रमजानपूर उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होतो. येथे दररोज आठ तास भारनियमन असते. दि.२४ मे २०१४ रोजी रात्री ८ वाजता गावात अंधार असल्यामुळे विनोद वानखडे यांच्या घरात पाटलीवर दिवा लावून ठेवण्यात आला होता. यावेळेस त्यांची चार वर्षीय मुलगी सलोनी विनोद वानखडे ही जेवण करीत होती. वानखडे यांचे घर कुडाचे असल्यामुळे हवा घरात सहज शिरते. हवा घरात शिरल्यामुळेच घरात लावण्यात आलेला दिवा सलोनीच्या अंगावर पडला व ती भाजली. तिला उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान २६ मे रोजी सलोनीचा मृत्यू झाला. चिमुकल्या सलोनीच्या निधनामुळे उरळ गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, वीज वितरणकडून करण्यात येत असलेले रात्रीचे भारनियमनच तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
भारनियमनाने घेतला चिमुकलीचा जीव
By admin | Published: May 27, 2014 7:17 PM