पारस : येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील वसाहतीत २८ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने फोडून तब्बल १३ ठिकाणी घरफोडी केली. सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा माल लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका रात्रीत घरफोड्या झाल्याने सुरक्षा विभाग व पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.
पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वीजनिर्मिती कंपनीकडून इमारतीचे बांधकाम केले आहे. प्रत्येक इमारतीमध्ये लिफ्टची व्यवस्था केली आहे. प्रत्येक मजल्यावर एकूण चार निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांमध्ये विद्युत कंपनीचे अधिकारी व कर्मचारी राहतात, परंतु चोऱ्या झालेल्या निवासस्थानातील सर्वच अधिकारी व कर्मचारी बाहेरगावी सुटीवर गेल्याने चोरट्यांनी योग्य पाळत ठेवून घरी नसल्याची संधी साधून तब्बल १३ ठिकाणी घरफोड्या केल्या. यामध्ये वसाहतीमधील एकूण १३ ठिकाणी चोरट्यांनी निवासस्थानाचे मेन गेट तोडून आतमध्ये प्रवेश करून चोरी केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पथक, फिंगर प्रिंट पथक, क्राइम ब्रँच, बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह तातडीने धाव घेऊन घटनास्थळाचे पंचनामे केले. ज्यांच्या घरांमध्ये चोरी झाली, त्यापैकी एकही अधिकारी वेळेवर उपस्थित होऊ शकला नाही. पुढील तपास बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. गेटवर तसेच प्रकल्पाच्या मेन गेटवर व वसाहतीमधील परिसरातही मेस्कोची प्रायव्हेट सुरक्षाव्यवस्था काम करत आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
............................
सुरक्षा अधिकारी म्हणतात माहिती देऊ शकत नाही
वसाहतीमधील झालेल्या १३ निवासस्थानांतील चोरीच्या प्रकरणाची माहिती पारस वीजनिर्मिती प्रकल्पाचे सुरक्षा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, मी माहिती देऊ शकत नाही, तुम्ही कल्याण अधिकाऱ्यांना माहिती विचारू शकता, असे त्यांनी सांगितले.
..........................
कल्याण अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही
पारस विद्युत वसाहतीमधील धाडसी चोरीच्या घटनेची माहिती विचारण्यासाठी कल्याण अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.