लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत १४ जून २०१६ च्या रात्री चोरी करून पसार झालेल्या अट्टल चोरट्याचा शोध लावण्यात खदान पोलिसांना रविवारी यश आले. पोलिसांनी यामध्ये नांदुरा येथून एका अट्टल चोरट्यास ताब्यात घेतले असून, त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. गोरक्षण रोडवरील सहकारनगरमध्ये राहणारे शरद कोकाटे हे कुटुंबासह घरात झोपलेले होते. चोरट्यांनी गुंगीच्या औषधाचा वापर करून त्यांच्या घरातील रोख रकमेवर हात साफ केला होता. यामध्ये घरात प्रवेश करून घरातील कपाटामधून ३ लाख रुपये रोख व १ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, यासह मोबाइल आणि एक दुचाकीही लंपास केली होती. चोरट्यांनी अनोख्या पद्धतीने ही चोरी केल्याने खदान पोलिसांसाठी हे एक मोठे आव्हान झाले होते. या घटनेनंतर त्यांनी खदान पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दिली. यावरून खदान पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदुरा येथून रविवारी रात्री मुनीर खा हयात खा (३३, रा. चांदूरबिस्वा) यास ताब्यात घेतले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
घरफोडीतील अट्टल चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:32 AM