अकोला : शहरातील खासगी वाहतूक बसेसचा थांबा म्हणून ओळखल्या जात असलेल्या रामलता हॉटेल समोरच्या परिसरात एका लक्झरी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने बस रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रचना ट्रॅव्हल्स कंपनीची एम. एच. ३० ए. ए. ८१०० क्रमांकाची बस रामलता हॉटेल समोर उभ असताना बसमधून अचानक धुर निघण्यास सुरुवात झाली. यावेळी नागरिकांमध्ये खळबळ उडाली. पाहता- पाहता बसला आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतले. काही कळण्याच्या आतच संपूर्ण बसने पेट घेतला. बस पेटल्याची वार्ता कळताच अग्निशामक दल घटनास्थळाव पोहचले. यावेळी अग्निशामक दलाच्या जवांनानी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. भर रस्त्यात बस पेटल्यामुळे वाहतुक अवरुद्ध झाली होती. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी उडाली होती. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. भर पावसात बसला आग लागली कशी, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे.