रोहणखेड : अकोट-अकोला मार्गाने एसटी २४ प्रवाशांना घेऊन अकोल्याहून अकोटकडे जात असताना पळसोद फाट्यानजीक बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटून २४ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातातील सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, अकोट-अकोला मार्ग हा धोक्याचा मार्ग झाला असून, या मार्गाने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अकोट आगाराची बस (क्र. एमएच ४० वाय ५७१४) ही चालक एस.बी. रावणकार व वाहक पी.डी. पोहरकर अकोल्याहून अकोटकडे जात असताना पळसोद फाट्यानजीक ट्रकने ओव्हरटेक केल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र २४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यापैकी सहाजण गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अकोट येथे उपचारार्थ पाठविले. तसेच आगार व्यवस्थापक भालतिलक यांनीही घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती आहे.