बोरगाव वैराळे : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली; मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा सुरळीत झाली नाही. २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली आहे. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तत्काळ ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.
बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे परिसरातील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी अकोला, हातरुण येथे जातात. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. बोरगाव वैराळे येथील जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी हातरुण येथील शिक्षणासाठी जातात. तसेच धामणा, दुधाळा, हातरुण, मंडाळा, खंडाळा येथील शेकडो विद्यार्थी अकोल्यातील महाविद्यालयात शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करण्यासाठी एसटी बस सुरू नसल्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खासगी वाहनधारक एसटी बससेवा बंद असल्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांकडून जादा भाडे वसूल करीत असल्याचे चित्र आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवित असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी म्हणून अकोला आगार क्रमांक दोनमधून वर्षभरापूर्वी अकोला येथून धावणारी सकाळी ७:३० वाजता व दुपारी ४:३० वाजता बस सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
------------------------------------------
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि अकोला शहरात येणाऱ्या रुग्णासोबत सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी बस सुरू करण्यासाठी आगारप्रमुखांशी चर्चा करणार.
नितीन देशमुख, आमदार.
------------------------------------------------
विद्यार्थ्यांची लूट; कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन
बससेवा बंद असल्याचा फायदा घेत खासगी वाहनधारक विद्यार्थ्यांकडून जादा भाडे वसूल करीत आहेत. तसेच क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवित असल्याने कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, कोरोनाचा धोका वाढला आहे. याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.