अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील अनेक बसगाड्या नियमित दुरुस्तीशिवाय धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. दरम्यान, या प्रकाराकडे आरटीओ आणि एसटी कार्यशाळा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात एसटी बसगाड्याकडे वळतात; मात्र एसटी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाअभावी ही हमी आता धोक्यात सापडली आहे. प्रवाशांनी चालक-वाहकांकडे तक्रार नोंदविल्यास ते थेट वरिष्ठांकडे बोट दाखवित असल्याने प्रवासी कमालीचे त्रासले आहेत.अकोला एसटी विभागाअंतर्गत असलेल्या मंगरूळपीर डेपोतील एमएच ४० एन ९७२० क्रमांकाच्या अकोला एक्स्प्रेस बसगाडीत २३-२४,३३-३४ आणि ३५-३६ सीट गहाळ आहे. त्यामुळे या गाडीतील प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. पर्यायाने उभ्याने प्रवास करावा लागतो आहे. सोबतच या बसगाडीतील खिडक्यांचे काच जाम झाले असल्याने त्या उघडता येत नाहीत. बसगाड्यांचे स्प्रिंगपाटेसुद्धा अनेक वर्षांपासून बदलले गेले नसल्याने गतिरोधकावर प्रवाशांना ट्रॅक्टरवरून प्रवास केल्यासारखे वाटते. या बसगाडीतील वाहक एस.जी. गावंडे यांच्याकडे प्रवाशांनी तक्रार केली असता, त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधण्याचे सांगितले. नादुरुस्त अवस्थेतील बसगाड्यांची अवस्था आरटीओ आणि एसटी कार्यशाळेच्या अधिकाऱ्यांना दिसत नसेल काय, असा प्रश्न प्रवाशांकडून होत आहे. यासंदर्भात अकोला एसटी कार्यशाळेच्या अधिकाºयांशी संपर्क साधला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ही अवस्था केवळ मंगरूळपीर डेपोचीच आहे असे नाही तर अकोला एसटी विभागातील अनेक डेपोची ही अवस्था असल्याचे जाणकार प्रवाशांचे मत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.नाममात्र होते दुरुस्तीप्रत्येक डेपोची बगसाडी एका विशिष्ट कालावधीनंतर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येते; मात्र येथे केवळ नाममात्र स्वरूपाची डागडुजी केल्या जाते. वास्तविक पाहता, अशा बसगाड्याची पासिंग आरटीओकडून जबाबदारीने करून घेणे गरजेचे असते; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पर्यायाने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.