अकाेला : महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येची दखल घेत फेब्रुवारी महिन्यात शहरातील मुख्य रस्ते, चाैकांमधील अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई सुरू केली हाेती. नंतर काेठे माशी शिंकली देव जाणे, प्रशासनाला अतिक्रमण निर्मूलन माेहिमेचा विसर पडल्यामुळे की काय, सर्वाधिक वर्दळीच्या गांधी राेडवर अकाेलेकरांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. वाहनांच्या गर्दीतून पायी चालायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहराच्या मध्यभागात मुख्य बाजारपेठ वसली आहे. यामध्ये गांधी चाैक, जुना भाजी बाजार, दाणाबाजार, किराणा बाजार, काेठडी बाजार, जुना कापड बाजार, नवीन कापड बाजार, जनता भाजी बाजार आदी परिसराचा समावेश आहे. साहजिकच, याठिकाणी विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची माेठी गर्दी दिसून येते. नेमक्या याच भागातील रस्त्यांसह चाैकांमध्ये लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. बाजारपेठेला अतिक्रमणाचा विळखा असताना ताे सैल करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेला कर्तव्याचा विसर पडल्याचे चित्र दिसून येते.
राेज असंख्य लोकांची ये-जा
गांधी राेड परिसरात विविध प्रकारचे साहित्य सहज उपलब्ध हाेत असल्याने या ठिकाणी नागरिकांची दरराेज गर्दी पहावयास मिळते. गांधी राेड भागात साेने, चांदी विक्रीची सर्वाधिक दुकाने आहेत. तसेच रेडिमेड कपडे, साैंदर्य प्रसाधनांची माेठी बाजारपेठ आहे.
फुटपाथ कागदावरच
गांधी राेड परिसरात पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी रस्त्यालगत पिवळे पट्टे मारून फुटपाथचे निर्माण करण्यात आले. गांधी चाैकातील वाणिज्य संकुलालगत असलेल्या फुटपाथवर हातगाडी चालक, चहा, प्लास्टिक साहित्याची विक्री करणाऱ्यांनी अतिक्रमण थाटले आहे.
अतिक्रमण हटाव दाखवायलाच
गांधी राेड परिसराला अतिक्रमणाचा विळखा पाहता मनपाने ठाेस उपाययाेजना करणे अपेक्षित आहे. तसे न करता अतिक्रमकांवर थातूरमातूर कारवाई केली जाते. अवघ्या तीन दिवसांपूर्वी या मार्गावर अतिक्रमण माेहीम राबवण्यात आल्याचा दावा अतिक्रमण विभागाकडून केला जाताे.
पायी चालायला भीती वाटते
खुले नाट्यगृहापासून ते सिटी काेतवाली तसेच गांधी चाैक ते माेहम्मद अली राेड भागात जाताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. लहान मुले, वयाेवृध्द नागरिक व महिलांना प्रचंड त्रास हाेताे.
- राहुल नागरे, शहरवासी
किराणा बाजार, दाणा बाजार, जुना भाजी बाजारात साहित्य खरेदीसाठी चारचाकी तर साेडाच दुचाकी वाहन घेऊनही जाता येत नाही. रस्त्याच्या दाेन्ही कडेने अतिक्रमकांनी ठाण मांडले असून त्यांना हुसकावण्यात मनपा अपयशी ठरली आहे.
-राजेश शेळके, व्यावसायिक
अधिकारी काय म्हणतात...
गांधी राेड व मुख्य बाजारपेठेत नेहमीच अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई केली जाते. अतिक्रमकांसाठी खुले नाट्यगृहामागील मैदानात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याकडे अतिक्रमकांनी पाठ फिरवली आहे.
-प्रवीण मिश्रा, अतिक्रमण विभाग प्रमुख, मनपा