बाळापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत नियमावली सादर करून मिनी लॉकडाऊन घोषित केले आहे. या मिनी लॉकडाऊनला शहरात व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असून, बुधवार व गुरुवारी (दि. ७ व ८) शहरातील अनेक दुकाने सुरू होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, दि. ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, अशा सूचना केल्या आहे. शहरात मंगळवारी आदेशाची अंमलबजावणी न करता बुधवार, दि. ७ एप्रिल २०२१ रोजी प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू केली. मिनी लॉकडाऊनला स्थानिक व्यावसायिकांनी विरोध दर्शवीत दुकाने सुरू ठेवली. तसेच आदेशाची अंमलबजावणी करताना प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारीही व्यावसायायिकांनी दुकाने सुरूच ठेवली. बाजारपेठेत कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. ही बाब उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार, मुख्याधिकारी, ठाणेदारांना सूचना दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कारवाईच्या भीतीने काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली, तर काहींची दुकाने सुरूच होती.
-------------------------