राजरत्न सिरसाट /अकोला : राज्यात खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक सुरू झाली असून, कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे. १५ नोव्हेंबरपासून राज्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारला सादर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २0११ पासून कापूस शिल्लक आहे. या संचयित कापसाचा आकडा २0 दशलक्ष टनापर्यंत पोहोचला आहे. यंदा विदेशात कापसाचे उत्पादन घटले आहे आणि आपल्याकडे ४00 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेची गरज ३00 लाख गाठींची आहे. भारतीय कापसाचा चायना मोठा आयातदार आहे; त्यामुळे चायना यावर्षी किती कापूस घेतो, याकडे शेतकर्यासह तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील कापसाला यावर्षी कमी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. असे असले तरी खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. यावर्षी हमीभाव ४१00 रुपये प्रतिक्विंटल मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ खरेदी केंद्रे केव्हा सुरू करणार याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. कापसाची आवक सुरू झाली असल्याने यावर्षी १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला, याकरिता कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असल्याचे महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन पी हिराणी यांनी सांगीतले. मागीलवर्षी सीसीआयने केली खरेदी मागील वर्षापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास (नाफेड) महासंघाचा अभिकर्ता म्हणून कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी केली. परंतु केंद्र शासनाने मागीलवर्षी कापूस खरेदीसाठी नाफेडशी करार केला नाही. त्यामुळे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाची खरेदी केली. त्यामुळे पणन महासंघाला सीसीआयचा अभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करावा लागला. गेल्यावर्षी राज्यात ११५ कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते.
पुढच्या महिन्यापासून कापूस खरेदी!
By admin | Published: October 09, 2015 1:57 AM