अकोला : ल्युब्रिकंट्स विक्री घोटाळ्याप्रकरणी अकोल्यात साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याची दाखल असली, तरी अकोल्यातील अनेक पेट्रोलपंप संचालकांना याचा लक्षावधीचा फटका बसल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. बदनामीच्या भीतीने अजूनही पेट्रोल पंप संचालक तक्रार करण्यास धजावलेले नाहीत. ल्युब्रिकंट्सची विक्री करण्यासाठी एका पेट्रोलियम कंपनीने नेमलेल्या चंद्रपूरच्या केतन शहा नामक एजंटने केलेल्या या घोटाळ्यात विदर्भातील अनेकांचा सहभाग दिसून येत असला, तरी आरोपी आणि फसवणूक झालेल्या इसमांची माहिती अजूनही स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी केतन शहाकडून ल्युब्रिकंट्सचा साठा घेणाऱ्या अलंकार मार्केटमधील रितेश चांडक नामक व्यक्तीस ताब्यात घेतले; मात्र त्याने स्वत:चीच फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्याने यासाठी न्यायालयात धावही घेतली. त्याची बाजू विचाराधीन ठेवून न्यायालयाने त्याला जामीन दिला, त्यामुळे प्रकरणाचा तपास पुढे सरकला नाही. दरम्यान, केतन शहाचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही. औद्योगिक वसाहतीमधील काही गोदामांवर पोलिसांचे लक्ष आहे. ल्युब्रिकंट्सचा काही साठा येथे साठविलेला असल्याची शंका आहे. एकीकडे पोलिसांच्या हाती काही आलेले नाही अन् दुसरीकडे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे अकोल्यासह संपूर्ण विदर्भातील फसवणूक झालेले पेट्रोल पंप संचालक वैतागले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट येथील दोन पेट्रोल पंप संचालकांचीदेखील फसवणूक झाली आहे. कंपनीचा आणि पेट्रोल पंप संचालकांचा विश्वासघात करून या एजंटने लाखोंचा गंडा घातला आहे. आता कंपनीचे अधिकारीदेखील या एजंटचा शोध घेत आहेत. अकोला पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी विचारणा केली असता, त्यांनी फसवणूक झालेल्या पेट्रोल पंप संचालकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले. अकोल्यातील काही पेट्रोल पंप संचालकांची यामध्ये फसगत झाली आहे; मात्र त्यांनी अजूनही तक्रार केली नाही, अशी माहितीही राठी यांनी दिली.
अलंकार मार्केटमधील चांडकला जामीन
By admin | Published: April 28, 2017 2:12 AM