अकोला: सात हजार रुपये किमतीचा मोबाइल केवळ अडीच हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याचा मोह नांदेड येथील एका युवकाला चांगलाच महागात पडला. स्वस्तात खरेदी केलेल्या मोबाइल फोनमुळे युवकाला थेट पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली. या युवकाच्या माहितीवरूनच ‘जीआरपी’ पोलिसांनी चोरीचे मोबाइल फोन विकणाºया युवकाला अटक केली आणि त्याच्याकडून नऊ मोबाइल फोन जप्त केले.वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथील अक्षय सुधाकर वंगल (२१) हा २ आॅगस्ट रोजी वर्धा जाण्यासाठी अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेसमधील सामान्य डब्यामधून यात्री प्रवास करीत होता. रेल्वेगाडीने रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर त्याच्या हातावर काठी मारून हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन खाली पाडला. चोरट्याने हा मोबाइल उचलला आणि पसार झाला. जीआरपीने वंगल यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आणि मोबाइल फोनच्या ईएमआय नंबर ट्रेसिंगला सायबर सेलकडे पाठविला. सायबर सेलकडून अक्षय वंगल याचा मोबाइल फोन नांदेड जिल्ह्यातील आष्टी येथील राहुल यशवंत कांबळे (२९) याच्याकडे असल्याची माहिती देण्यात आली. जीआरपी पोलिसांनी त्याला नांदेड येथून ताब्यात घेतल्यावर, त्याची चौकशी केल्यावर त्याने हा मोबाइल फोन अकोट फैलातील शंकर नगरात राहणारा रोहित दशरथ पवार (२१) याच्याकडून केवळ अडीच हजार रुपयांमध्ये विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी रोहित पवार याला २८ डिसेंबर रोजी अटक केल्यावर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे नऊ मोबाइल फोन जप्त केले. राहुल कांबळे यालासुद्धा पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी रोहित पवार याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. ही कारवाई जीआरपीचे एपीआय प्रवीण वांगे, पीएसआय एस.ए. भिसे, तानाजी बहिरम, एएसआय खुशाल शेंगटे, प्रशांत मुंढे, असलम खान पठाण, संतोष वडगिरे, सतीश जंजाळ, प्रशांत वानखडे, शैलेश शेगोकार व उज्ज्वल चौरपगार यांनी केली. (प्रतिनिधी)