- सदानंद सिरसाट,अकोला: शेतकºयांचा ‘नॉन एफएक्यू’ उडीद घेण्यास अकोट खरेदी केंद्राने नकार दिल्यानंतर व्यापाºयांमार्फत आलेला तोच उडीद केंद्रात खरेदी करण्यात आला. व्यापाºयांकडून खरेदी केलेल्या त्या ‘नॉन एफएक्यू’ दर्जाच्या खरेदीमुळे नाफेड, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला ४२८ क्विंटल खरेदीपोटी २० लाखांचा फटका बसला. या खरेदी घोटाळ्यात जबाबदारी निश्चित झाल्याने अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांना निलंबित केल्याचा आदेश मार्केटिंग फेडरेशनने बुधवारी दिला. त्यांचा प्रभार अकोट येथील सहायक उपनिबंधकांकडे देण्यात आला आहे.हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी शासनाने ३ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू केली होती. जिल्ह्यात नाफेडच्यावतीने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा येथे केंद्रं सुरू झाली. त्या केंद्रांतील खरेदी प्रक्रियेसाठी तालुका खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. अकोट केंद्रात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांचा मूग, उडीद ‘नॉन एफएक्यू’ असल्याचे कारण देत नाकारण्यात आला. केंद्रातील ग्रेडर्स यांनी नाकारल्याने शेतकरी तो उडीद परत घेऊन गेले. तोच उडीद शेतकºयांनी खासगी व्यापाºयांना विकला. त्यावेळी व्यापाºयांनी त्यांच्याकडून सात-बाराच्या प्रतीही घेतल्या. त्या आधारे व्यापाºयांनी खरेदी केंद्रात आधीच नाकारलेला तोच उडीद केंद्रात विक्री केला. अकोट तालुका खरेदी-विक्री संस्थेने डिसेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात त्याचा साठा करण्यासाठी अकोला येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात पाठविला. त्या ठिकाणी ग्रेडर्सनी ४२८ क्विंटल उडीद ‘एफएक्यू’ दर्जाचा नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना कळविले. त्यानुसार उडीद अकोट केंद्रात परत पाठविण्यात आला. सोबतच जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी अकोट खरेदी-विक्री केंद्रातील संबंधित ग्रेडर्सना कारणे दाखवा नोटीसही बजावली. त्यानंतर उडिदाची प्रतवारी सुधारून त्याचा साठा करण्याची तयारीही झाली. याबाबत ‘लोकमत’ने ९ डिसेंबर २०१७ रोजी वृत्त प्रसिद्ध करीत व्यापाºयांकडून ‘नॉन एफएक्यू’ उडीद खरेदी केल्याचे वास्तव मांडले होते. त्यामुळे हा खराब उडीद राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील साठ्यातून बाहेर ठेवण्यात आला. त्यामुळे अकोट केंद्रात खरेदी झालेल्या १९०० क्विंटल साठ्यापैकी ४२८ क्विंटल ‘नॉन एफएक्यू’ उडीद खराब असल्याने तो साठ्यातून वगळण्यात आला. या प्रकाराच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनीही मार्केटिंग फेडरेशन, सहकार मंत्र्यांकडे केल्या. त्यानुसार फेडरेशनने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक के.जी. कानडे यांना तातडीने अकोल्यात पाठविले. त्यांनी ६, ७ फेब्रुवारी रोजी चौकशी करीत वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी तराळे यांची जबाबदारी निश्चित झाली. त्यावरून तराळे यांना निलंबित करण्यात आले, असे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक (प्रशासन) कदम यांनी सांगितले.