अकोला : वीजपुरवठा संहितेनुसार वीज बिलाच्या थकबाकीसाठी खंडित करण्यात आलेल्या जागेवरील थकीत वीज बिल भरल्याशिवाय त्या जागेवर नवीन वीज जोडणी देता येत नाही. त्या जागेची विक्रीद्वारे हस्तांतरण झाले असल्यास त्या जागेच्या नवीन मालकाला किंवा वारसदाराला किंवा कायदेशीर प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला त्या जागेवरील थकीत वीजबिल भरावे लागणार आहे.
महावितरणकडून पाठपुरावा केल्यानंतरही ग्राहक वीज बिल भरण्याला प्रतिसाद देत नसल्याने परिमंडला अंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील २ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून त्यांच्याकडे २१९ कोटी रुपयाचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी वसुलीसाठी अशा ग्राहकांचे स्थळ परीक्षण करताना काही ठिकाणी विक्रीदाराकडून ग्राहकांना वीजबिलाची जुनी थकबाकी दर्शविली जात नाही व ग्राहक नवीन नावाने वीजजोडणी घेत असल्याचे महावितरणच्या लक्षात आले आहे.
थकीत रक्कम नवीन वीज जोडणीवर वळती होणार
वीजबिलाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर थकीत रक्कम न भरता नवीन वीज जोडणी घेण्यात आली असेल, तर त्या जागेवरील वीजबिलाची थकबाकी आणि त्यावरील व्याज हे नवीन चालू असलेल्या वीज जोडणीवर वळती करण्यात येणार आहे.
तरीही सुटका नाहीच
जर ग्राहक वीज बिलाची थकबाकी भरण्यास प्रतिसादच देत नसेल तर,वीज नियामक आयोग, वीजपुरवठा संहितेनुसार त्या ग्राहकाच्या दुसऱ्या ठिकाणी कुठेही सुरू असलेल्या चालू वीज बिलावर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले थकीत वीज बिल आणि व्याजाची रक्कम वळती करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं?
वीज बिलाची थकबाकी असलेल्या स्थळी नवीन वीज जोडणी देण्यासंदर्भात निकाल देताना जागेची मालकी बदलली तरी नवीन मालकाकडून पूर्वीच्या वीज बिलांच्या थकबाकीची रक्कम वसुली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.