अकोला: धर्माच्या नावाखाली ज्यांना प्रताडित केले आहे, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी नागरिकता संशोधन विधेयक आहे. हे विधेयक नरेंद्र मोदींनी नाही, तर अहिंसेचे पुजारी महात्मा गांधींनी दिले आहे. असे मत वक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मांडले.राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते म्हणून शिवराय कुळकर्णी सभेत बोलत होते. देशाची फाळणी झाल्यानंतर जे अल्पसंख्याक पाकिस्तानात राहतील, अशांना उद्या जर त्यांच्यावर धर्माच्या आधारावर अत्याचार होत असतील, तर भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले करण्यात येतील, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याची आठवण कुळकर्णी यांनी करून दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानातून प्रताडित होऊन आलेल्या अल्पसंख्याकांना भारतात नोकरीसह अन्य सुविधादेखील उपलब्ध करण्यात येतील, असे विचार महात्मा गांधींचे होते; पंडित नेहरू यांनीदेखील प्रधानमंत्री आकस्मिक निधीचा उपयोग पाकिस्तानातून आलेल्या अल्पसंख्याकांकरिता करायला पाहिजे. असे स्पष्ट केले होते त्यामुळे गांधी नेहरूच्या विचारांचा वारसा सांगणारेच आज फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव घेऊन नागरिकता संशोधन विधेयकाला विरोधक विरोध करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.१९४७ मधील फाळणी वेळी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची संख्या २४ टक्के एवढी होती. आज मात्र १.३ टक्क्यावर आली आहे. भारतात फाळणी वेळी अल्पसंख्याक २ टक्के होते. आता ३० टक्के आहे. याबाबतचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे कुळकर्णी म्हणाले. जगाच्या पाठीवर मुस्लीम क ोठेच सुरक्षित नाहीत, जेवढे भारतात ते सुरक्षित आहेत. चित्रपटसृष्टीतील ‘खानावळी’लासुद्धा भारत असुरक्षित वाटत असल्याचे विधान करतात, तर प्रसंगी ‘भारत आमचे घर आहे’, असे म्हणण्यासही ही खानावळ विसरत नाहीत, असा टोला कुळकर्णी यांनी मारला. देशात एनआरसी येऊ नये, यासाठी सीएएला विरोध सुरू आहे. हा विरोध केवळ सीएएला नाही, तर हे एक षड्यंत्र आहे. देश महाशक्ती होण्याच्या वाटेवर आहे. या वाटेला अडथळा आणण्यासाठी हा विरोध सुरू असल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, हरीश आलिमचंदानी, नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, रमेश गोतमारे, डॉ. गजानन कºहे, अंबरीश पारेख, रमेश चौधरी, अनिल शिंदे, हरीश पारवानी, अॅड़ सत्यनारायण जोशी, अॅड़ मोतीसिंह मोहता, अॅड़ सुनीता कपिले, डॉ. रणजित सपकाळ, अॅड़ विजय मुरई, रामाभाऊ उंबरकर, दीपेन शाह, शैलेंद्र कागलीवाल, अशोक डालमिया, निकेश गुप्ता, अॅड. मनीषा कुळकर्णी व रमेश कोठारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक बिडवई यांनी केले. संचालन स्वानंद गीताश्री यांनी केले.राष्ट्रगानाने वातावरण भारावले!‘हम करे राष्ट्र आराधन’,‘जयस्तुते-जयस्तुते’, अशा राष्ट्रभक्तीगीत गाऊन वातावरण भारावून गेले होते. आनंद जहागीरदार, कविता वरघट यांच्या सुरेल आवाजाला विवेक देशपांडे, गजानन रत्नपारखी यांची साथसंगत लाभली. महेश जोशी यांनी ‘केसरी बाणा सजाये’ हे गीत सादर केले.
‘सीएए’ मोदींनी नाही, तर गांधींनी सर्वप्रथम मांडले - शिवराय कुळकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 2:30 PM