लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केंद्र शासनाच्या नागरिक त्व दुरुस्ती कायदा (सीएए)आणि भारतातील अवैध रहिवाशांना ओळखून त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी लागू केलेल्या ‘एनआरसी’ कायद्यामुळे संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण झाली असून, मुस्लीम बांधवांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जनभावनेचा आदर करीत केंद्र शासनाने दोन्ही कायदे रद्द करण्याचे आवाहन मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद कारंजवी-रिजवी यांनी केले. स्थानिक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमलेल्या असंख्य मुस्लीम बांधवांना त्यांनी मार्गदर्शन केले.स्थानिक ‘एसीसी’च्या मैदानावर ‘तहफ्फुजे कानून-ए-शरियत कमिटी’च्यावतीने रविवारी जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मौलाना अब्दुल रशिद कारंजी-रिजवी यांनी उपस्थितांना संबोधित केले. सर्व जाती-धर्म समूहांचा मिळून हा देश तयार झाला आहे. भाजप शासित केंद्र सरकारला शासन करायचे असेल तर सर्व जाती-धर्मांचा आदर करावा लागेल. केंद्र सरकार द्वेषपूर्ण भावनेतून कायदे लादत असेल तर ही बाब कदापि सहन केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर मौलाना सैयद जहीरुल इसलाम ऊर्फ जकीमियां नक्शबंदी, मौलाना सफदर कासमी, मौलाना अब्दुल जब्बार मजाहरी, मौलाना गुलाम मुस्तफा, कारी मकसूद अहमद, मुफ्ती गुफरान गाजी, मौलाना तुफैल नदवी, मुफ्ती मोहम्मद हुफैज, मौलाना अब्दुल वाहिद, सैयद शाहनवाज जुल्फुकारी यांच्यासह भन्ते अश्वजित थेरो, वजीर खान, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रदीप चोरे, फादर मार्क्स ए. खांडेकर उपस्थित होते. केंद्र शासनाने लागू केलेले दोन्ही कायदे संविधान व देशाच्या अखंडतेच्या विरोधात असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संचालन मुफ्ती अशफाक कासमी यांनी केले. आभार सैयद जमीर बावा यांनी मानले. जनसभेसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्याने कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता शहरातील बाजारपेठ बंद होती.
सीएए, एनआरसीमुळे देश अस्वस्थ; कायदा रद्द करा! - मौलाना अब्दुल रशीद कारंजी-रजवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:19 PM