अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातून उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांना (बीडीओ) पत्र पाठविण्यात आले असून, उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अल्प पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील तालुकानिहाय पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांना गत १ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्र पाठवून, तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ह्यएसडीओंह्णकडून पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचे प्रस्ताव मागविले
By admin | Published: November 09, 2014 12:36 AM