- राजरत्न सिरसाट
अकोला : राज्यातील खासगी महाविद्यालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुमार दर्जा असलेल्या विदर्भातील एका खासगी कृषी महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. महाविद्यालय चालविण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता न करणारी राज्यात अशी ३५ च्यावर कृषी महविद्यालये आहेत. यातील काही महाविद्यालयांनी सुधारणा केल्याचे वृत्त आहे.कृषी महाविद्यालयातून भावी शास्त्रज्ञ, अधिकारी निर्माण होतात. शेती व विकासात यांचा मोलाचा सहभाग असतो. म्हणूनच खासगी कृषी महाविद्यालयांकडे तज्ज्ञ शिक्षक वर्ग तर लागतो, अद्ययावत प्रयोगशाळा तसेच उपकरण, इमारत, शेतजमीन, यंत्रसामग्रीची तेवढीच गरज असते. राज्यात १८७ कृषी महाविद्यालये आहेत. यापैकी १५५ च्यावर खासगी कृषी महाविद्यालयांचा समावेश आहे. यातील अनेक कृषी महाविद्यालयाकडे या सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र (एमसीईएआर) कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने २०१७ मध्ये माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती नेमली; परंतु कृषी विद्यापीठांनी आपलीच समिती असावी, असा आग्रह धरला. तत्कालीन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर एमसीईएआरचे अध्यक्ष होते, तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.राम खर्चे होते. शासनानेही ठाम राहत डॉ. पुरी समिताला तपासणीचे अधिकार दिले. समितीद्वारे राज्यातील सर्वच कृषी महाविद्यालयाचा एक वर्ष आढावा घेण्यात आला. एक वर्षापूर्वीच समितीने त्यांचा अहवाल एमसीईएआर व शासनाकडे दिला आहे. या अहवालानुसार ३५ च्यावर कृषी महाविद्यालये क व ड श्रेणीत असल्याचे त्यात म्हटले आहे. भारतीय कृषी (आयसीएआर) संशोधन अधिस्वीकृती समितीनेही याच कारणावरू न कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती थांबविली होती. याच दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारीतील सुमार दर्जा असलेल्या वर्धा येथील कृषी महाविद्यालयाची मान्यता रद्द केली असून, इतर दोन कृषी महाविद्यालयांची तपासणी करण्यात येत आहे.दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी एमसीईएआरची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. पुरी समितीवर चर्चा झाल्याने पुन्हा खासगी कृषी महाविद्यालयांच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.डॉ. पुरी समितीने एक वर्षापूर्वी अहवाल दिला आहे. आम्हीही तपासणी केली असून, यात काही महाविद्यालयांचा दर्जा सुधारत असल्याचे चित्र आहे. वर्धा येथील सुमार दर्जाच्या कृषी महाविद्यालयाची मान्यता रद्द केली आहे.- डॉ. व्ही. एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.-------डॉ.राम खर्चे,उपाध्यक्ष,एमसीईएआर,पुणे.