अकोला: कर्करोगावरील खर्चिक उपचार आणि महागड्या औषधांमुळे अनेक रुग्णांना योग्य व निरंतर उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधांच्या विक्रीवर असलेल्या ट्रेड मार्जिनची ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कर्करोगावरील औषधे स्वस्त होणार असून, या नव्या किमती ८ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.देशात १.५ दशलक्ष कर्करोगाचे रुग्ण असून, २०१८ मध्ये आठ लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वीस वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. एकीकडे कर्करोगाने पीडित रुग्णांची वाढती संख्या अन् महागड्या उपचारामुळे अनेक रुग्ण जगण्याची आस सोडून देतात. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा देत ४२ अॅन्टी-कॅन्सर औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोगासंदर्भात केंद्र सरकारने गठित केलेल्या एका समितीने या सर्व बाबींचा अभ्यास केल्यावर कर्करोगावरील औषध परवडणाऱ्या दरात असावी, अशी शिफारस नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीकडे (एनपीपीए) केली होती. त्यानुसार केंद्रीय खत आणि रसायन मंत्रालयातर्फे ४२ कॅन्सर औषधांच्या किमती नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात डिपार्टमेंट आॅफ फार्मास्युटिकल्सने नोटिफिकेशन जारी केले आहे.१६ टक्क्यांपर्यंत ट्रेड मार्जिन अनिवार्यट्रेड मार्जिनमध्ये कपात करण्यात आलेल्या ४२ औषधांवर ८ ते १६ टक्के ट्रेड मार्जिन लावण्याचे अनिवार्य राहणार असल्याची माहिती आहे. या यादीत समाविष्ट नसलेल्या इतर औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लावू शकणार असल्याची माहिती आहे.
सरकारने यापूर्वीच हृदयरोगास आणि स्टेंट्स नियंत्रणात आणले आहे. आता कर्करोगाच्या औषधांचे दर नियंत्रणात आणल्याने गरीब रुग्णांना याचा फायदा होईल.- डॉ. व्ही. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.