अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ‘ऑनलाइन’ पद्धतीने सादर करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज आणि जात पडताळणीचे प्रस्ताव ‘ऑफलाइन’ पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची वेळ वाढविण्यात आल्याने, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करताना तांत्रिक अडचणी, इंटरनेटचा वेग कमी असणे, सर्व्हर डाऊन होणे अशा तक्रारी येत असल्याने, उमेदवारी अर्ज पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ‘ऑफलाइन’ पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वेळ वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (३० डिसेंबर रोजी) ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती सादर करणे आवश्यक आहे. मात्र, जात पडताळणीसाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने, ३० डिसेंबर रोजी जात पडताळणीचे प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश!
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासह स्वीकारलेले उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये भरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.