अकोला, दि. १0- शिस्तप्रिय तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांची मजबूत फळी, असे विविध दाखले देणार्या भारतीय जनता पार्टीच्या जहाजाला निवडणुकीपूर्वीच भगदाड पडले आहे. पक्षाने नियुक्त केलेल्या काही बुथ प्रमुखांसह भाजयुमोच्या पदाधिकार्यांना तिकीट न मिळाल्याची सल मनात कायम ठेवून नाराज बुथ प्रमुखांनी उमेदवारांच्या पाठीशी उभे न राहण्याचा अघोषित निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकारामुळे निवडणूक रिंगणात उभे राहणार्या उमेदवारांची कोंडी झाली असून तटबंदीच्या दुरुस्तीकडे पक्षाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आजपर्यंंत एकमेकांच्या गळ्य़ात गळे घालून फिरणार्या भाजप-शिवसेनेची युती यंदा संपुष्टात आली. युती तुटल्यामुळे दोन्ही पक्ष मनपाच्या आखाड्यात पहिल्यांदाच स्वबळावर सामोरे जात आहेत. भाजपच्या तोडीस तोड शिवसेनेने उमेदवार दिले असून दोन्ही पक्षांत घमासान रंगण्याची चिन्हे आहेत. यात भरीस भर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील आघाडी न करता एकमेकांच्या समोर शड्ड ठोकले आहेत. अर्थातच, मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे साहजिकच महापालिकेतील सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. भाजपची मजबूत पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांंचे विस्तारलेले जाळे पाहता निवडणुकीत संपूर्ण यंत्रणा कामाला लागेल, अशी अपेक्षा असताना ज्या बुथ प्रमुखांना व भाजयुमोच्या पदाधिकार्यांना पक्षाने तिकिटे नाकारली त्यांनी पक्षाच्या विरोधात बाह्या वर खोचल्याची माहिती आहे. पक्षाने विश्वास ठेवून तिकीट देणार्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे न राहता बुथ प्रमुखांनी स्वमर्जीचा कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांनी आयोजित केलेल्या बैठकांकडे बुथ प्रमुखांसह भाजयुमोच्या पदाधिकार्यांनी पाठ फिरवल्याचे प्रकार बहुतांश प्रभागांमध्ये समोर येत आहेत.जुने कार्यकर्तेही अस्वस्थ!ह्यआरएसएसह्णच्या तालमीत तयार झालेल्या स्वयंसेवकांना पक्षात मानाचे स्थान आहे. रामदासपेठ, जठारपेठ, सातव चौक, दिवेकर चौक, जुने शहरातील जयहिंद चौक, अगरवेस, गोडबोले प्लॉट, रेणुका नगर, शिव नगर, गणेश नगर भागात जनसंघाचे जुने जाणते स्वयंसेवक पक्षाच्या पाठीशी होते. तिकीट वाटप प्रक्रियेतून काही मर्जीतल्या कार्यकर्त्यांंना डावलल्याचा रोष मनात ठेवून पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात जनसंघातील काही स्वयंसेवक सरसावल्याची माहिती आहे.म्हणे, पदाधिकारी व्यस्तभाजपने नियुक्त केलेले सरचिटणीस, भाजयुमोच्या पदाधिकार्यांवर मोठी जबाबदारी असताना संबंधित पदाधिकार्यांकडून उमेदवारांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पक्षाने सोपवलेल्या कामात ह्यबिझीह्ण असल्याचे सांगून सरचिटणीस, मंडळ अध्यक्षांसह भाजयुमोच्या पदाधिकार्यांकडून उमेदवारांची बोळवण केली जात असल्याचे बोलल्या जात आहे.
भाजपाच्या बुथ प्रमुखांचा उमेदवारांना ठेंगा
By admin | Published: February 11, 2017 2:31 AM