डॉ. किरण वाघमारे / अकोलानिवडणूक म्हटली की मतदार हा सर्वात महत्त्वाचा. मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याकडे उमेदवारांचा कल असतो; परंतु आता मतदारांशी थेट भेट घेण्याऐवजी मोठ-मोठय़ा प्रचार सभांवरच उमेदवार अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. मतदारांशी अटॅचमेंट नसल्यामुळे उमेदवारांप्रति मतदारांच्या मनात फारसी आपुलकी पहावयास मिळत नाही. पूर्वी निवडणूक म्हटली की, प्रत्येक उमेदवाराचा भर रहायचा तो अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा. जितक्या जास्त मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करता येईल, तेवढी आपली बाजू मजबूत होऊ शकते, याचा उमेदवारांना विश्वास होता. यासाठी उमेदवार पदयात्रा काढत असत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असे. प्रत्येक गल्ली, मोहल्ला अथवा कॉलनीमध्ये छोटेखानी सभा ठरलेलीच असे. चहा-पाणी आणि पान-सुपारीच्या कार्यक्रमासोबत उमेदवार मतदारांशी संपर्क साधत असे. घरातील प्रत्येक व्यक्तीची उमेदवार आस्थेने चौकशी करीत असे. मतदारांनादेखील उमेदवार आपल्या घरी आला की चांगले वाटत असे. उमेदवाराचे ते चांगल्याप्रकारे स्वागत करीत असत. उमेदवाराशी थेट बोलता येत असल्यामुळे मतदारांनादेखील उमेदवाराबद्दल सहानुभूती वाटत असे. याचा परिणाम अनेकवेळा मतपेटीमध्ये दिसून येत असे. आताच्या निवडणुकीत उमेदवार प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यापेक्षा मोठय़ा जाहीर सभांवरच अधिक भर देत आहेत. आपल्या पक्षाच्या मोठय़ा नेत्यांची सभा आयोजित करण्यातच या उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. काही उमेदवार रॅली काढतात; परंतु ती रॅली नुसतीच रस्त्यांवरून फिरते. त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडतो, हा संशोधनाचा विषय आहे. काही उमेदवार पदयात्रा काढतात; परंतु ते नुसतेच हात जोडून किंवा हात हलवित रस्त्यावरून धावत असतात. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. उमदेवार आपल्या घरापर्यंत येऊन आपली दखल घेण्यास फारसा उत्सुक नाही, हे माहीत असल्यामुळे मतदारदेखील उमेदवाराप्रति फारशी सहानुभूती बाळगत नाही.आता मोबाईल, इंटरनेट आणि व्हॉटस अँपचा जमाना आहे. काही उमेदवार आणि पक्ष या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांशी संपर्क करीत आहेत. या साधनांच्या माध्यमातून मतदारांची मते कदाचित मिळविता येतील; परंतु मतदारांचे मन कसे जिंकणार? सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार आणि मतदारांमध्ये वाढलेले अंतर प्रकर्षाने जाणवत आहे.
उमेदवारांचे मतदारांशी ‘नो अटॅचमेंट’
By admin | Published: October 09, 2014 1:26 AM