लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले असून, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि त्यांतर्गत अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकांसह जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आले आहे.भाजपने मागितले उमेदवारी अर्ज!जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर १० डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्या तालुकानिहाय बैठका सुरू!जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका २९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत.या बैठकांमध्ये तालुका स्तरावरील पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांचे अर्जदेखील घेण्यात येत आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी सांगितले.
शिवसेनेकडे ४०० उमेदवारी अर्ज प्राप्त!शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातून ४०० उमेदवारी अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत शिवसेना जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाले, अशी माहिती शिवसेना निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी दिली.