अकोला: जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंंबरपासून सुरू होणार असून, १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२५ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून २३ ते ३० डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात येणार असून, मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनामार्फत निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक होत असलेल्या
ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
तालुका ग्रा.पं.
अकोला ३६
अकोट ३८
बाळापूर ३८
बार्शीटाकळी २७
पातूर २३
तेल्हारा ३४
मूर्तिजापूर २९
.......................................
एकूण २२५
इच्छुकांची तयारी;
गावागावांत बैठका सुरू!
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पॅनल गठित करण्यासह उमेदवारांची निवड करण्यासाठी गावागावांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.