अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लकडगंज परिसरात मनोज बलोदे नामक युवकाच्या घरातून पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने दोन हजार १३५ किलो भांग जप्त केल्यानंतर आराेपीस गुरुवारी न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली.
लक्कडगंज येथील रहिवासी मनोज रामहरक बलाेदे याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून विशेष पथकाने सापळा रचून बुधवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात २ हजार १३५ किलो भांग व सहा किलो भिजवलेली भांग अशाप्रकारे एकूण दोन हजार १४१ किलो भांग जप्त केली. ही भांग सुमारे दोन टन असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष पथकाने मनोज बलाेदे यांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आराेपीस न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली.