पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
अकोला : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील रहिवासी दोघेजण अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात सुमारे पाच किलो गांजा घेऊन येत असताना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने त्यांना राष्ट्रीय महामार्गावर अटक केली. या दोघांकडून पाच किलो गांजासह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोराडा कुऱ्हा येथील रहिवासी विठोबा मुरलीधर गरुडे व गजानन श्रीकृष्ण कांडेलकर हे दोघेजण गांजा व इतर अमली पदार्थाची बाळापुर मध्ये विक्री करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवून हायवे ट्राफिक पोलिस चौकीजवळ त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्या दोघांकडून सुमारे पाच किलो गांजा, एक दुचाकी व मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस एक्ट व कलम 20 बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.