लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात सर्व प्रकारची दोन लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. कालबाह्य झालेल्या जुन्या वाहनांमुळे वायुप्रदूषण होत आहे; तर काही ट्रक, कंटेनर आणि दुचाकी वाहनांना कर्णकर्कश हॉर्न बसवून ध्वनिप्रदूषण केले जात आहे. असे असताना पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होण्याचे प्रमाण नगण्य आहे.
जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही गेल्या काही वर्षांत तुलनेने अधिक आवाज करणारी बुलेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. ही गाडी ठराविक वेगाने चालविली तर तिचा आवाज ठिकठाक असतो. मात्र, सायलेन्सरच्या पुंगळ्या काढल्या की तोच आवाज कर्णकर्कश व नकोसा होतो. यासह महामार्गावरून धावणाऱ्या काही ट्रक, कंटेनरलाही कर्णकर्कश हॉर्न बसविण्यात आले. ते पोलिसांना ऐकू येत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
------
फॅन्सी हॉर्नची फॅशन
अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर व पातूर या सहा शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत वाहनांना फॅन्सी हॉर्न बसविण्याची जणू फॅशन जडली आहे. कर्णकर्कश स्वरूपातील हॉर्नमुळे समोरच्यांना त्रास होत असेल, याची जाणीव न ठेवता काही लोकांकडून चुकीचा प्रकार अवलंबिण्यात आला आहे.
कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...
वाहनांच्या मूळ रचनेत परवानगीशिवाय बदल करता येत नाही; मात्र अनेकजण मन मानेल तसा बदल करतात.
वाहनांच्या हॉर्नचे किंवा सायलेन्सरचे कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद नव्या निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अकोला शहरात या प्रकारच्या ८५ कारवाया करण्यात आल्या आहेत.
कानाचे आजार वाढू शकतात
शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेल्या कानांना कर्णकर्कश आवाजाने बाधा पोहोचू शकते. विशेषत: दुचाकी वाहने व महामार्गावरून जड वाहतूक करणाऱ्या ट्रक, कंटेनरच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे कानाचे आजारही वाढू शकतात.
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाया केल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून कर्णकर्कश हॉर्न असलेल्या वाहनांची चाचपणी करण्यात आली आहे. अकोला शहरात फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेटवर सायलेन्सर जप्त करून ते नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नवरही बहुतांशी नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
- गजानन शेळके
प्रमुख वाहतूक शाखा अकोला
-----------
वाहनचालकांना झालेला दंड
२०२० २०२१
ट्रिपल सीट
नो पार्किंग झोन
विना परवाना
कर्णकर्कश हॉर्न/ फटाके फोडणाऱ्या बुलेटचे सायलेन्सरवर कारवाई १६ हजार ८५ हजार