अकोला, दि. १८- दुचाकी चोरी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्येच पिकांवर फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्याचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला असून, चेतन मानतकर आरोपी असलेल्या प्रकरणाचे दस्तावेज सीआयडीने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनमधून ताब्यात घेतले, तर एमआयडीसी पोलीस स्टेशनचा प्रभार बुधवारी किशोर शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे.एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात गोरक्षण रोडवरील रहिवासी चेतन मानतकर (२0) आणि लहान उमरीतील रहिवासी रॉबिन्सन बोर्डे (२७) या दोघांना अटक केली होती. या दोन्ही चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या होत्या. सदर आरोपी १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असताना पोलीस कर्मचारी पंकज तायडे, रवी खंडारे आणि सलीम पठाण या तिघांनी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी तीनही पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने चेतन मानतकर याने शौचाला जाण्याचे कारण सांगून शौचालयात असलेले विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळीच चेतनचा मृत्यू झाला.या प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गांभीर्याने लक्ष घालून दोषी असलेल्या पंकज तायडे, रवी खंडारे आणि सलीम पठाण या तिघांना तत्काळ निलंबित केले, तर ठाणेदार शिरीष खंडारे यांना नियंत्रण कक्षात बदली केली. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतापोलीस अधिकारी कर्मचार्यांवर गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहेत. पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये चेतनला मारहाण केली का, या सर्व दिशेने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी चौकशी केली आहे, तर आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागानेही दुचाकी चोरी प्रकरणासह चेतनच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यामध्ये चेतनविरुद्ध समोर येणार्या अहवालावरून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सीआयडीने घेतले दस्तावेज ताब्यात
By admin | Published: January 19, 2017 2:53 AM