कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्र व राज्य शासनाने २३ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू केली होती. टाळेबंदीमुळे सर्व उद्योग-व्यवसाय विस्कळीत झाले असून, शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. १ जूननंतर ‘अनलॉक’चा पहिला टप्पा सुरू करण्यात आला हाेता. यामध्ये ठरावीक उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यादरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा-महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. शालेय सत्राला २६ जूनपासून प्रारंभ झाल्यानंतर शासनाने ऑनलाइन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे निर्देश जारी केले. त्या पार्श्वभूमीवर खासगी शाळा व महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे बोलले जात असले तरी वस्तुस्थिती समोर आली आहे. गरीब व सर्वसामान्य पालकांकडून महागडा मोबाइल घेणे शक्य नसल्यामुळे त्यांचे पाल्य ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत असल्याची परिस्थिती आहे. मनपाच्या ३३ शाळांमधील केवळ १२४४ विद्यार्थ्यांकडे मोबाइल उपलब्ध आहेत.
मनपा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क असल्याचे कागदोपत्री बाेलले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळी आहे. मनपाच्या ३३ शाळांमधील ६ हजार ६८८ विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्यामुळे ते ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती आहे. सर्व शिक्षा अभियानामार्फत केवळ १२४४ विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत.
तांदूळ वाटपापुरता संपर्क!
शालेय पाेषण आहार याेजनेंतर्गत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दाेन महिन्यांनंतर पाेषण आहाराचे वाटप केले जात आहे. शिक्षकांकडून तांदूळ वाटप करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाेबत संपर्क साधला जाताे. शिकवणीकडे पाठ फिरवले जात असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याप्रति मनपा प्रशासन व सर्वपक्षीय नगरसेवक गंभीर हाेतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.