कुरणखेड : काेराेनाच्या संकटकाळात आशा स्वयंसेविकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या आशा स्वयंसेविकांनी नागरिकांच्या आराेग्याची काळजी घेत काेराेना प्रतिबंधाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण याेगदान दिले. त्यापैकीच कुरणखेड प्राथमिक आराेग्य केंद्राच्या स्वयंसेविका, आशासेविका वंदना संताेष इंगळे यांनी परिसरातील काेराेना रुग्णांची सेवा केली. रुग्णांची सेवा करताना त्यांनाही काेराेनाची बाधा झाली, मात्र त्यांनी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून त्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य दिले.
आशासेविका म्हणून कार्यरत असलेल्या वंदना इंगळे या गावातील रुग्णांची अविरत सेवा करत आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत सहभागी होऊन सेवा देणे, आतापर्यंत गावातील १११ गरोदर महिलांना रात्री-बेरात्री डिलिव्हरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय येथे रेफर करणे, गरोदर मातांची योग्य ती योग्य वेळी काळजी घेणे, गावातील बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यामागे यांचा मोठा वाटा आहे. कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर त्यांनी धैर्याने ताेंड दिले. सुरुवातीला मुंबई, पुणे बाहेरहून जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना घरपोच जाऊन त्यांची तपासणी करणे, माहिती घेणे, अशा २०० संशयित रुग्णांची त्यांनी तपासणी केली. आतापर्यंत गावातील ८० च्यावर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली असता त्यांच्या भागातील ५० पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणे, त्यांना औषधाेपचार करण्यासह त्यांनी सेवा दिली. दरम्यान, त्यांचाही काेराेना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना १४ दिवस डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठस्थित काेविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन राहावे लागले. तेथून सुटी मिळाल्यानंतर त्यांनी लगेच रुग्णसेवा सुरू ठेवली. गावातील संदिग्ध रुग्णांची भेट घेऊन त्यांना माहिती देत औषधाेपचारासाठी तयार केले. त्यांच्या सेवेमुळे गावातील अनेक रुग्ण बरे झाले. दरम्यान, काही रुग्णांच्या नातेवाइकांनी त्यांच्यासाेबत वाद घातला. तरीही त्यांनी कर्तव्य न सोडता, त्यांनी रुग्णसेवा दिली. मात्र, त्यांच्या कार्याचे प्रशासनाकडून काैतुक झाले नाही. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे.
--------काेट--------
सरकारने आशासेविकांंचे मानधन वाढवून दिले पाहिजे. रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या आशासेविकांना तुटपुंजे मानधन मिळत आहे. महागाईच्या काळात सरकारने आशासेविकांना किमान २० हजार रुपये मानधन दिले पाहिजे. आम्हाला कायमस्वरूपी करावे.
-वंदना संतोष इंगळे, आशासेविका, कुरणखेड