महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यातून काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसात काेराेना सदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरीही बाजारपेठेत,दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांकडून नियम पायदळी तुडवल्या जात आहेत. त्याचे परिणाम समाेर आले असून शनिवारी शहरातील तब्बल ३७४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़
पूर्व व दक्षिण झाेन हाॅटस्पाॅट
शहरात काेराेना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. दाेन्ही झाेनमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता हाॅटस्पाॅट ठरलेल्या झाेनकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे. शनिवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे तब्बल १२८ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ४७ , उत्तर झोनमध्ये ५४ व दक्षिण झोनमध्ये १४५ असे एकूण ३७४ रुग्ण आढळून आले आहेत.
१,६५७ जणांनी केली चाचणी
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेन निहाय चाचणी केंद्र सुरु केले असता शनिवारी १,६५७ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये ४३३ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच १,२२४ जणांनी रॅपिड ॲंटीजन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.