संसर्गजन्य काेराेना विषाणूमुळे सर्व उद्याेग, व्यवसाय ठप्प झाले हाेते. हातावर पाेट असणाऱ्या गरीब नागरिकांसमाेर उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली हाेती. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी मागे घेतली. यादरम्यान, नागरिकांनी ताेंडाला मास्क लावणे, आपसात चर्चा करताना किमान चार फूट अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले हाेते. या नियमांचा नागरिकांना विसर पडल्याचे परिणाम आता समाेर येऊ लागले आहेत. लग्न समारंभ, बाजारपेठ, एसटी बस, खासगी प्रवासी वाहतुकीदरम्यान नागरिक संपर्कात आल्यामुळे पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यांत काेराेनाचा वाढता संसर्ग ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने काेराेना चाचणी केंद्रांची संख्या वाढवली आहे. साेमवारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला अहवाल प्राप्त झाला असता, शहरातील ३४९ जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे मनपाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पूर्व, दक्षिण झाेन आघाडीवर
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात काेराेनाबाधित रुग्णांचा आकडा वाढीस लागल्याचे समाेर आले आहे. यातही काेराेनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पूर्व व दक्षिण झाेनमध्ये असल्याचे चित्र आहे. साेमवारी पूर्व झोनमध्ये १५४, पश्चिम झोनमध्ये ४९, उत्तर झोनअंतर्गत ५९ व दक्षिण झोनअंतर्गत ८७ असे एकूण ३४९ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
९६५ जणांचे घेतले नमुने
काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून नागरिक चाचणीसाठी केंद्रांवर गर्दी करीत आहेत. साेमवारी ४३४ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ५३१ जणांनी रॅपिड ॲण्टीजेन चाचणी केली. सर्दी, ताप, खाेकला, घशात खवखव, थकवा आदी लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी थेट काेराेना चाचणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.