महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांत काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याची परिस्थिती आहे. राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरीही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दिलेल्या अवधीत दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांकडून नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. त्याचे परिणाम समाेर येत असून मंगळवारी शहरातील २५८ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़
पूर्व व दक्षिण झाेनची परिस्थिती बिकट
शहरात काेराेना बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहे. दाेन्ही झाेनमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता हाॅटस्पाॅट ठरलेल्या झाेनकडे मनपाने लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे तब्बल ११४ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ३६ , उत्तर झोनमध्ये ३५ व दक्षिण झोनमध्ये ७४ असे एकूण २५८ रुग्ण आढळून आले आहेत.
१५७१ जणांनी केली चाचणी
शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र सुरु केले असता मंगळवारी १५७१ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये ४१७ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ११५४ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.