सभापतिपदासाठी दाेन नामनिर्देशन अर्ज
अकाेला : मनपाच्या स्थायी समिती सभापती पदासाठी साेमवारी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. भाजपच्यावतीने संजय बडाेणे व शिवसेना, काँग्रेस आघाडीच्यावतीने प्रमिला गीते यांचा उमेदवारी अर्ज प्राप्त झाला. उद्या मंगळवारी सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१,८०६ जणांचे घेतले स्वॅब
अकाेला : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काेराेना चाचणीला वेग आला आहे. साेमवारी मनपा प्रशासनव्दारे शहरातील एकूण १,८०६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. ज्यामध्ये आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन चाचणीचा समावेश आहे. नागरिकांनी काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
भाजपतर्फे महिलांचा सत्कार
अकाेला : भारतीय जनता पार्टीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पूर्व मंडळात विविध क्षेत्रात कामकाज करून कार्याची छाप उमटविणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापाैर अर्चना मसने, माजी महापाैर अश्विनी हातवळणे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित हाेत्या.
शहरात २३३ जणांना काेराेनाची बाधा
अकाेला : महापालिका क्षेत्रात संसर्गजन्य काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे काेराेना चाचणीसाठी शहरातील नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. साेमवारी शहरातील २३३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
अकाेलेकरांनाे चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे समाेर आले आहे. शहराच्या प्रत्येक भागात काेराेना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे वैद्यकीय यंत्रणांवर ताण येत असून परिस्थिती लक्षात घेता अकाेलेकरांनी काेराेना सारखी लक्षणे असल्यास चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
चाचणीसाठी नागरिकांची गर्दी
अकाेला : महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात काेराेना चाचणीसाठी केंद्र उघडले आहेत. प्रत्येक केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. साेमवारी मनपाच्या भरतिया व कस्तुरबा रुग्णालयात नागरिकांची चांगलीच गर्दी उसळल्याचे दिसून आले. यावेळी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र हाेते.
लसीकरणासाठी ज्येष्ठांचा पुढाकार
अकाेला : शहरात ६० वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला ३ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला लसीकरणासाठी आखडता हात घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आता लसीकरणाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. साेमवारी मनपाच्या कस्तुरबा गांधी व भरतिया रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.