सचिन राऊत ,अकोला : माझोड येथील शेत जमिनीची मोजणी झाल्यानंतर मोजणी शीट देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील अभिलेखपाल शैलेश टोपरे यांच्याविरोधात अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझोड येथील रहिवासी तक्रारकर युवकाच्या पत्नीची मझोड शिवारात शेती आहे. या शेतीच्या वहिवाटीसाठी त्यांनी भूमी अभिलेख विभागात मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने माझोड येथील शेत जमिनीची मोजणीही केली; मात्र त्यानंतर अकोला भूमी अभिलेख विभागातील अभिलेखपाल शैलेश सुधाकरराव टोपरे वय ४२ वर्षे याने मोजणी शीट देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाणे पडताळणी केली असता लाच मागितल्याचे समोर आले. मात्र आरोपी शैलेश टोपरे यास संशय आल्याने तो रक्कम घेण्यासाठी आला नाही. मात्र पडताळणी व तांत्रिक बाबीवरून आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.