अकोला: खदान पोलिस स्टेशन हद्दीतील गुरूनानक विद्यालयातील शिक्षकांनी प्रचंड मानसीक छळ केल्याने पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन ९ मार्च राेजी आत्महत्या केली हाेती. या प्रकरणी खदान पाेलिसांनी तपास करून शाळेतील शिक्षकांसह एकूण पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकारामूळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
शहरातील सिंधी कॅम्प येथे गुरूनानक विद्यालय आहे. या ठिकाणी खदान परिसरातील एक पंधरा वर्षीय विद्यार्थी शिक्षण घेत होता. शाळेतील शिक्षकांनी त्यांचा अतोनात छळ केल्यामुळे त्याने ९ मार्च रोजी घराच्या पहील्या माळयावर असलेल्या खाेलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती.
त्यानंतर या प्रकरणाचा तपास खदान पोलिसांनी करून २२ मार्च रोजी उशिरा रात्री शाळेतील शिक्षकांसह एकूण पाच जणांविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५, ५०६, २९४ आणि ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.