लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना बोगस रोपे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवत शेतकर्यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये नुकसानभरपाई आणि तीन हजार रुपयांचा न्यायिक खर्च द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला. जिल्हा ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशावर शेतकर्यांच्यावतीने राज्य ग्राहक मंचात अपील दाखल केले जाणार असल्याची माहिती अँड. रवींद्र पोटे यांनी दिली. दरम्यान, शेतकर्यांनी बोगस केळी रोपेप्रकरणी अनधिकृत एजंट म्हणून आरोप केलेल्या चंद्रकांत श्रीराम पालखडेविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस केळी रोपे देऊन फसवणूक झाल्याची तक्रार शेतकर्यांनी कृषी विभागाकडे केली होती. कृषी विभागाने याप्रकरणी चौकशी करून व पाच कृषी तज्ज्ञ सदस्यांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती नियुक्त केली होती. सदर समितीने प्रत्यक्ष शेतात जाऊन मोका पाहणी केली आणि शेतकर्यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाले आहे, असा स्वयंस्पष्ट अहवाल दिला. सदर अहवालाची आकडेवारी केळी संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या शिफारशीनुसार देण्यात आली होती. त्यानुसार शेतकर्यांनी अकोला जिल्हा ग्राहक मंचात नुकसानभरपाईकरिता तक्रार दाखल केली होती. शेतकर्यांच्या तक्रारीवरून सदर प्रकरणी अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने मे इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना जबाबदार धरून शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार रुपये द्यावेत आणि न्यायिक खर्च म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये द्यावे, असे एकूण प्रत्येकी ३३ हजार रुपये निकालाची प्रत मिळाल्यापासून १५ दिवसांपर्यंत अदा करावेत, अन्यथा तक्रारकर्त्यास दरसाल दरशेकडा आठ टक्के दराने व्याज द्यावे, असा निकाल विद्यमान मंचाने दिला आहे; परंतु सदर नुकसानभरपाई कमी प्रमाणात आहे. ग्राहक मंचात दाखल केलेल्या दाव्यानुसार नुकसानभरपाईची ही रक्कम खूपच कमी असल्याने जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाचा सन्मान करीत राज्य ग्राहक मंचात अपील दाखल केले जाणार असल्याचे शेतकर्यांचे वकील अँड. रवींद्र पोटे यांनी कळविले आहे. दरम्यान, याप्रकरणी शेतकर्यांना बोगस केळी रोपे फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कृषी विभागाने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत शासनाच्या तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार रमेश रामचंद्र अकोटकरसह कंपनीविरुद्ध तसेच याप्रकरणी दिलीप अकोटकर यांच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस तपासातसुद्धा याप्रकरणी एजंट असल्याचा शेतकर्यांनी आरोप केलेल्या चंद्रकांत श्रीराम पालखडे रा. वणी वारुळा याच्याविरुद्धसुद्धा भादंविच्या कलम ४२0, ३४ तसेच बियाणे नियंत्रण आदेश ३, ९, १८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल लागल्यानंतर समोर आली आहे.
बोगस केळी रोपेप्रकरणी एजंटविरुद्धही गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:25 AM
अकोला : अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना बोगस रोपे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी नुकसानभरपाई म्हणून इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवत शेतकर्यांना प्रत्येकी ३0 हजार रुपये नुकसानभरपाई आणि तीन हजार रुपयांचा न्यायिक खर्च द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला.
ठळक मुद्देराज्य ग्राहक मंचात अपिल दाखल करणार!