अकोला : रिझर्व्ह बँकेकडून दिली जाणारी नियमित कॅश अचानक रोखल्याने, एटीएममध्ये ठणठणाट आहे. अकोला शहरातील ५४ पैकी केवळ १० एटीएम सुरू असल्याने जनतेतून बँकांविरुद्ध ओरड सुरू झाली आहे. स्टेट बँकेचे मोजके एटीएम वगळता इतर सर्व एटीएम शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाल्यानंतर देशभरातील एटीएम बंद पडले होते. त्यानंतर अनेक दिवस ही स्थिती कायम होती. तशीच अवस्था गत काही दिवसांपासून एटीएमची झाली आहे. मोजके एटीएम सोडले, तर जिल्ह्यातील सर्व एटीएम कॅशलेस झाले आहेत. नगद रकमेसाठी अनेकांना या एटीएमवरून त्या एटीएमवर धाव घ्यावी लागत आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने लोकांना विविध खर्चासाठी रोकड लागते. एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट असल्याने नागरीकांची कोंडी झाली आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेने नुकताच शेतकऱ्यांना २५४ कोटींचे पीक कर्ज मंजूर केले; ही रक्कम एटीएम द्वारेच काढण्याचे आदेश असल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास दोनशे एटीएम ग्राहकांना सेवा देतात. नोटाबंदीनंतर कॅशलेसला चालना देण्यासाठी जिल्ह्यात पॉस मशीनची मागणी वाढली. दोन हजार पॉस मशीन अकोल्यात आहेत, तरीही मोठ्या प्रमाणात कॅशची मागणी वाढत आहे. दररोज अकोल्यातील एटीएममध्ये पाच कोटी रुपयांची कॅश रोज भरावी लागते. या रकमेत थोडी जरी अनियमितता आली, तरी ग्राहकांकडून ओरड सुरू होते. त्याचा सर्वात जास्त परिणाम स्टेट बँकेच्या एटीएमवर पडतो. टॉवर चौकातील स्टेट बँक शहरातील सर्वात मोठी बँक असून, सर्वात जास्त ग्राहक या बँकेचे आहेत. पाच कोटींपैकी तीन कोटींची कॅश रोज स्टेट बँकेला एटीएममध्ये भरावी लागते; मात्र गत काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेने कॅश रोखल्याने एटीएमच्या बाहेर कॅश नसल्याचे फलक लागले आहेत. रिझर्व्ह बँकेकडूनच कॅश येत नसल्याने सर्वच बँकांची कोंडी झाली आहे. अनेक एटीएम तर अनेक दिवसांपासून बंद पडून आहेत. एटीएममधून रकमा निघत नसल्याने काही दिवसांत अकोल्यातील एटीएमची संख्या घटण्याचे संकेत आहेत.दैनंदिन आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे.पीक कर्जाची रक्कम खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएमवर गर्दी करण्याऐवजी कृषी सेवा केंद्रावरून कॅशलेस व्यवहार करावा. नागरिकांनीदेखील डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करावेत. कॅश व्यवहार असुरक्षित आहे. जर कुणी कॅशलेसच्या व्यवहारास नकार देत असेल, तर त्यांची तक्रार जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अग्रणी बँकेकडे करावी.- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.स्टेट बँकेच्या ३५ एटीएमवर दररोज तीन कोटींची कॅश भरावी लागते. रिझर्व्ह बँकेकडून कॅश रोखल्या गेल्याने सर्वांनाच त्रास होत आहे. कॅश व्यवहार टाळण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा. भविष्यात कॅश हाताळणे कमी होणार आहे, यासाठी जनजागृतीची जास्त गरज आहे. आता रेशन दुकानातील व्यवहारदेखील कॅशलेस होणार आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी नवीन धोरण स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी करावी, त्याशिवाय पर्याय नाही. -एस.टी. बोर्डे, मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक अकोला.
रिझर्व्ह बँकेने कॅश रोखल्याने एटीएम कॅशलेस
By admin | Published: April 20, 2017 1:15 AM