- सचिन राऊत
अकोला : चाईल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत धडक कारवाया सुरू आहेत. चाईल्ड पॉर्न संकेतस्थळावर क्लिक करतानाही सावधान हाेण्याची गरज आहे. त्यासंबंधित कोणतेही व्हिडिओ, फोटो तुम्ही कुणाला पाठवला तर तुम्हांला जेलमध्ये जावे लागू शकते.
चाईल्ड पॉर्न बनविणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे. सरकारने एक पाऊल पुढे टाकत लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचविण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. असे जरी असले तरी जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या घटना क्वचितच घडल्या असल्या तरी या प्रकरणातील आराेपींना बेडया ठाेकण्यात आल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सायबर पोलिसांचे यावर विशेष लक्ष आहे. यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली असून, कोठेही, कोणीही चाईल्ड पोर्नोग्राफी पाहत असेल, पोस्ट करत असेल किंवा फॉरवर्ड करत असेल तर सायबर पाेलीस त्यांचा लगेच शाेध घेणार आहेत.
जिल्ह्यातही केली कारवाई
जिल्ह्यात या वर्षांत एकावर कारवाई करण्यात आली होती. त्याआधी २०२० मध्ये तिघांवर कारवाई करण्यात आली होती. जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी गुन्ह्यांचे प्रमाण जरी कमी असले तरी भविष्यात अशा घटना समोर येऊ नयेत म्हणून सायबर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
तर दहा लाखांचा दंड, सात वर्षांची शिक्षा
चाईल्ड पोर्नोग्राफी गुन्हयात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७, ६७ ए नुसार कारवाई करून गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये त्या आरोपीला कमीत कमी पाच वर्षे शिक्षा आणि १० लाख रुपये दंड तर जास्तीत जास्त ७ वर्षांची शिक्षा व दहा लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
कारवाईसाठी सायबर गस्त
मागील काही महिन्यांमध्ये चाईल्ड पाेर्नाेग्राफी पाहणाऱ्यांवर तसेच सर्च करणाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती पाेलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात चाइल्ड पाेर्नाेग्राफी पाहू नये यासाठी सायबर गस्त सुरू असते. त्यामुळे असे प्रकार घडत नसल्याचेही वास्तव आहे.
पोर्नाेग्राफीतील आराेपींच्या नावावर पायबंद
सायबर पाेलिसांकडून तुमच्या माेबाइलवर लक्ष ठेवले जात आहे. वादग्रस्त पाेस्ट करणे, चाइल्ड पाेर्नाेग्राफी पाहणे किंवा सर्च केल्यास सायबर पाेलिसांना लगेच माहिती मिळते. त्यानंतर अशा आराेपींवर तातडीने कारवाई करण्यात येते. या प्रकरणातील आराेपींची नावेही उघड करण्यात येत नसल्याची माहीती आहे.