अकोला: जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेची गती वाढत आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांसोबच गर्भवतींच्या लसीकरणासही सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात बेडरेस्टवर असणाऱ्या नागरिकांना घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने आशा वर्कर्समार्फत जिल्हाभरात माहिती संकलित केली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोविडची लस घेतली आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त असून, दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. कोविड लसीकरणाचा वेग कासवगतीने वाढत असला, तरी प्रत्येक घटकापर्यंत लसीकरण मोहीम पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहेत. १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणानंतर काही दिवसांपूर्वीच गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता विविध आजारांमुळे किंवा इतर कारणांमुळे बेडरेस्टवर असणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. मोहिमेंतर्गत अशा नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आशा वर्कर्समार्फत माहिती संकलनाचे कार्य केले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. माहिती संकलनाचे काम पूर्ण होताच, जिल्ह्यात घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.
रुग्णांमध्ये जनजागृतीची गरज
- डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलेल्यांनाच घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.
- मात्र, आजारी असताना लस घ्यावी की नाही, याबाबत अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
- नागरिकांमधील हा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्यात जनजागृतीची गरज आहे.
- यासाठी आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्याची गरज आहे.
सहा महिने उठू शकत नाही, अशा बेडरेस्टवर असणाऱ्या लोकांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने आशा वर्कर्समार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही मोहीम शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लस दिली जाईल.
- डॉ.मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला