अकोला: शिर्डी-पुरी एक्स्प्रेसमध्ये दिव्यांगांच्या बोगीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात हा युवक इंजिनिअर असल्याचे समोर आल्यानंतर त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अकोला, मनमाड आणि भुसावळ रेल्वे स्टेशनवरील सीसी फुटेजची तपासणी सुरू केली आहे.विशेषकुमार श्रीपालसिंग चव्हाण (३०) रा. लेहडरा. ता. मळमुक्तेश्वर जि. हापूल, उत्तर प्रदेश असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विशेषकुमार हा गाडी नंबर १८४०८ डाउन शिर्डी-पुरी एक्स्प्रेस गाडीच्या दिव्यांगांच्या बोगीतून प्रवास करीत होता. अकोला रेल्वेस्थानकादरम्यान त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर विशेषकुमारचा मृतदेह बडनेरा रेल्वे पोलिसांनी गाडीतून बाहेर काढला. या युवकाजवळ मनमाड ते बिलासपूर असे तिकीट आढळून आले होते. बडनेरा पोलिसांनी या युवकाची ओळखही पटविली. त्यानंतर युवकाचे शवविच्छेदन केले असता त्यात युवकाचा मृत्यू गळा आवळून झाला असावा, असे समोर आल्याने पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळ हे अकोला रेल्वेस्थानकादरम्यान असल्याने बडनेरा पोलिसांनी अकोला रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. रेल्वे पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावरचे सीसी ताब्यात घेतले आहेत. यासोबतच भुसावळ आणि मनमाड येथील फुटेज पोलीस तपासत असून, दिव्यांगांच्या बोगीत कुणी चढ-उतार करताना दिसते काय, याचा तपास करणार आहेत.