अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार, ४ एप्रिल रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो खिश्चन समाजबांधवांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. शहरातील काही मोजक्या प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथॉलिक प्रार्थनास्थळांमध्ये यावेळी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, दरवर्षी पाल्म संडे आणि ईस्टर संडे निमित्त काढण्यात येणारी दिंडी आणि शांतीयात्रा यावेळी रद्द करण्यात आली.
मागील रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात पाल्म संडे अर्थात झावळ्यांचा रविवार साजरा करण्यात आला. त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूने क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात २ एप्रिल रोजी गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार 4 एप्रिल रोजी येशूच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला. यावेळी शहर आणि जिल्ह्यात प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक अशा दोन्ही पंथांच्या चर्चेसमधून आणि धर्मगुरूंच्या निवासस्थानी प्रार्थनासभांचे आयोजन करून त्यांचे समाज माध्यमावरून थेट प्रसारण करण्यात आले. खदान खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी ईस्टर निमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला. यावेळी चर्चच्या सदस्यांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केली. यावेळी प्रभू भोजनविधीही आयोजित करण्यात आला होता.
कोरोनामुक्तीसाठी प्रात:कालीन प्रार्थना
रविवारी पहाटे सहा वाजता प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त बेथेल झेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले होते. अशाप्रकारची प्रात:कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ अकोल्यातच होते, हे उल्लेखनीय! यावेळी पुनरुत्थान झालेल्या येशुकडे जगाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनी परिसरात ईस्टर संडे निमित्त आनंदाचे वातावरण पसरले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जस्टीन मेश्रामकर, सरला मेश्रामकर, वर्षा वाळके, राजेश ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे, अरविंद बिरपॉल, वैशाली मेश्रामकर यांनी परिश्रम घेतले.