नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षिका मीरा पागोरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
२६ जानेवारी २०२१ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.१५ वाजता शास्त्री स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार असून, ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
या दिवशी ८.३० ते १०.०० वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय व अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा
ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असेल त्यांनी ते सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १०.०० वाजेनंतर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलीस दलाचे दोन, होमगार्डचे दोन व एनसीसी विद्यार्थ्यांचा एक असे एकूण पाच प्लॅटून संचालनात सहभागी होणार आहेत, तसेच अग्निशामक दलाचे वाहन व रुग्णवाहिकेचा समावेश राहणार आहे. आरोग्य व मनपाच्या चित्ररथाचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग
राहणार नाही, तसेच कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांना आमंत्रित करू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमात कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करून सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून सहभागी व्हावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.