अकोला : दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज, देशासाठी योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती, राष्ट्रगीताचे आसमंतात निनादणारे सूर, अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी अकोल्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, अनिता भालेराव, उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक व शहिद सैनिकांचे कुटुंबिय, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीताची धून वाजवून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहिद सैनिक यांच्या कुटुंबियांना व विविध मान्यवर, अधिका-यांना भेटून संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
वीरमाता , वीरपिता , विरपत्नींचा गौरव !स्वातंत्र्यदिन सोहळ्यात दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले .
सुभाष दुधगावकर , दीपक सदाफळे यांचा गौरव!पोलीस उपअधिक्षक सुभाष दुधगावकर यांना गुणवत्तापूर्णा सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल, तसेच आपत्ती व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जीवरक्षक दीपक सदाफळे यांना यावेळी गौरविण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !शिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील गुणवंत अनुज गारवे, दिविज बन्सल, अंश अग्रवाल, रिद्धी राठी, समृद्धी काळंके, अथर्व ठाकूर, अंशुल पटोकार, शौर्या शेगोकार या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सुंदर गाव पुरस्कार सरपंचांना प्रदान!जिल्हा परिषदेतर्फे आर. आर. आबा पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द या गावाचे सरपंच व सचिवांना प्रदान करण्यात आला. तालुका सुंदर गाव पुरस्कार कोठारी (ता. अकोला), लोहारी खु. (ता. अकोट), उरळ बु. (ता. बाळापूर), खेर्डा (ता. बार्शीटाकळी), सोनोरी (ता. मूर्तिजापूर), गावंडगाव (ता. पातूर), इसापूर (ता. तेल्हारा) या गावांच्या सरपंच व सचिवांना प्रदान करण्यात आला.